चालू घडामोडी (14 जानेवारी 2020)
आजचा दिनविशेष
- भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव व्दारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला होता.
- सन 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 मध्ये झाला.
- लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र 14 जानेवारी 1948 मध्ये सुरू झाले.
- सन 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
ऑस्करची नामांकने जाहीर
- जगभरात प्रतिष्ठा असलेल्या 92व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा ‘जोकर’ सर्वाधिक 11 नामांकनांचा मानकरी ठरला आहे.
- तर क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’, मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘द आयरिश मॅन’ आणि सॅम मेंडीसचा ‘1917’ या चित्रपटांना प्रत्येकी 10 नामांकने जाहीर झाली आहेत.
- दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या ‘पॅरासाइट’ला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.
कालचा अंक नक्की वाचा.
चालू घडामोडी (13 जानेवारी 2020)
प्रथमच ‘चिनुक’, ‘अपाचे’ वाढवणार प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टची शान
- यंदाच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीत होणाऱ्या इंडियन एअर फोर्सच्या फ्लायपास्टमध्ये चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स सुद्धा सहभागी होणार आहेत.
- फ्लायपास्टमध्ये इंडियन एअर फोर्सची फायटर विमाने, हेलिकॉप्टर्स हवाई कौशल्य दाखवतात. अमेरिकन बनावटीची चिनुक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स गेल्यावर्षी इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाले.
- ‘अपाचे’ हे मिसाइलने सुसज्ज असलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. युद्ध काळात दुर्गम भागात शस्त्रास्त्र आणि अन्य साहित्य पोहोचवण्यासाठी चिनुक हे अत्यंत उपयोगी हेलिकॉप्टर्स आहे.
- अपाचे हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढली आहे. जवळपास 280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही. जवळपास पावणे तीन तासांपर्यंत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचं तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे.
- तर शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. अपाचे एएच-64ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ विमान आहे.
- 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर 1986 मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.
- तसेच ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. बोइंग सीएच-47 चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते.
स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदला स्पॅनिश चषकाचे जेतेपद
- निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत सामना सुटल्यानंतर गोलरक्षक थिबॉट कोटरेइसने ‘पेनल्टी-शूटआऊट’मध्ये केलेल्या अप्रतिम बचावामुळे रेयाल माद्रिदने रविवारी स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे 11व्यांदा विजेतेपद पटकावले.
- ‘पेनल्टी-शूटआऊट’पर्यंत रंगलेला हा थरार 4-1 असा जिंकत रेयाल माद्रिदने आपल्या चाहत्यांना नववर्षांची अनोखी भेट दिली. रेयाल माद्रिदचे या मोसमातील हे पहिलेच विजेतेपद ठरले.
- तर स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी प्रथमच स्पेनबाहेर म्हणजेच सौदी अरेबिया येथे खेळवण्यात आली. याला बराच विरोधही झाला. पण स्पेनचे फुटबॉलप्रेमी हजारो मैल प्रवास करून सौदी अरेबियात उपस्थित होते. त्याप्रमाणे अर्थातच त्यांना रंगतदार अंतिम लढत बघायला मिळाली.
कोल्हापूरच्या पुजाने जिंकलं सलग दुसरं सुवर्णपदक
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लूट कायम ठेवली आहे.
- सोमवारी 16 सुवर्ण, 19 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह भारताने एकूण पदकांचा आकडा 70 वर नेला आहे.
- तर स्पर्धेत गेले दोन दिवस सायकलपटू पूजा दानोळेने गाजवले. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
- तसेच पूजाने मुलींच्या 30 किलोमीटर शर्यतीत ताशी 35 किलोमीटर वेगाने सायकलिंग करताना 55 मिनिट 42.32 सेकंदात ही शर्यत जिंकली.
- मुलांमधून सिद्धेश पाटीलने कांस्यपदक मिळवले. मुलांच्या 50 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत सिद्धेशने 1 तास 9 मिनीट 36.49 सेकंद या अंतरासह कांस्यपदक जिंकले.
जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरू
- चीनमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि संवेदनशील रेडिओ टेलिस्कोप सुरू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या टेलिस्कोपची चाचणीच तीन वर्षे घेण्यात येत होती.
- तर हा टेलिस्कोप बनविण्यासाठी चीनला तब्बल 20 वर्षे लागली. हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.
- तसेच चीनमध्ये एवढी प्रगत टेक्नॉलॉजी आहे की, हजारो किमी लांबीचे रस्ते आणि गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी काही महिनेच लागतात. मात्र, या टेलिस्कोप निर्मितीच्या कामाने चीनला मोठा वेळ खर्ची घालावा लागला आहे.
- तर हा टेलिस्कोप गुईझोऊ प्रांतामध्ये बांधण्यात आला आहे. 2016 पासून याची चाचणीच घेण्यात येत होती.
- हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अरेसिबो ऑब्झर्व्हेटरीपेक्षा 2.5 पटींनी संवेदनशील आहे. प्युर्टोरिकास्थित ऑब्झर्व्हेटरीमध्ये जगातील दुसरा मोठा सिंगल डिश रेडिओ टेलिस्कोप कार्यरत आहे. याचा वापर अंतराळात दूरवर जीवजंतूंचा शोध आणि एलियन्सचा शोध घेण्यासाठी करण्याच येतो.
- चीनचा टेलिस्कोप एका सेकंदात 28 जीबी माहिती गोळा करण्यात सक्षम आहे. यामुळे त्याला फाईव्ह हंड्रेड मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप (फास्ट) असे नाव देण्यात आले आहे. फास्टची अंतराळातील रेंज चार पटींनी जास्त आहे.
- टेलिस्कोपने आतापर्यंत जवळपास 44 पल्सरचा शोध लावला आहे. पल्सर हा वेगाने फिरणारा न्यूट्रॉन किंवा तारा असतो, जो रेडिओ लहरी आणि विद्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो. या टेलिस्कोपच्या पाच किमीच्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही.


0 Comments