3 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जानेवारी 2020)
चीनच्या मदतीने पाकिस्तानने बनवलं JF-17
- राफेल फायटर विमानाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने JF-17 या फायटर विमानामध्ये सुधारणा केली आहे.
- तर राफेल हे आजच्या घडीचे जगातील अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल फायटर जेट विकत घेण्याचा करार केला आहे. त्यातील तीन विमाने भारताकडे सुपूर्द करण्यात आली असून यावर्षी ती इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल होतील.
- तसेच JF-17 हे चीन आणि पाकिस्तानने मिळून संयुक्तपणे विकसित केलेले फायटर विमान आहे. JF-17 च्या नव्या आवृत्तीचा लवकरच पाकिस्तानी हवाई दलात समावेश होणार आहे. या विमानाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यावर्षी डिसेंबर महिन्यात विमानाच्या नव्या आवृत्तीने पहिले उड्डाण केले.
- तर दक्षिणपश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडुमध्ये JF-17 ब्लॉक 3 विमानाची उड्डाण चाचणी घेण्यात आल्याची माहिती एअरोस्पेसशी संबंधित असलेल्या मॅगझिनने दिली.
- सध्या JF-17 फायटर विमाने पाकिस्तानी हवाई दलाकडे आहेत. मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्यादिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. त्यामध्ये JF-17 विमाने सुद्धा होती. JF-17 ही सिंगल इंजिन विमाने पाकिस्तानच्या पीएसी आणि चीनच्या सीएसीने मिळून विकसित केली आहेत.
- चीनकडे असलेल्या अत्याधुनिक J-20 फायटर विमानांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे तंत्रज्ञान JF-17 च्या नव्या आवृत्तीमध्ये वापरण्यात आले आहे. JF-17 ची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी नव्या आवृत्तीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
- J-10C, J-16 आणि J-20 प्रमाणे JF-17 मध्ये विमानाच्या दिशेने येणाऱ्या मिसाइलची माहिती देणारी इन्र्फारेड सिस्टिम बसवण्यात आली आहे. यावर्षी २०२० मध्ये JF-17 च्या नव्या आवृत्तीचा पाकिस्तानी हवाई दलात समावेश करण्यात येईल.
(कालचा नक्की वाचा):
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौरा करणार असून नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटी जमा केले जाणार आहेत. जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.
- तसेच देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.
हॉकीपटू सुनीता लाक्राची निवृत्ती
- भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.
- भारताच्या महिला हॉकी संघाने 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
- तसेच त्या संघात सुनीताचा समावेश होता. 28 वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
सुनीताने 139 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
वैद्यकीय चमू आणि समाजमाध्यम तज्ज्ञाची नेमणूक
- खेळाडूंच्या दुखापतींवर कमी वेळेत अचूक उपाययोजना करण्यात अनेकदा अपयशी ठरल्यामुळे टीकेचा धनी ठरलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) लवकरच वैद्यकीय चमूची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुधारित योजनेचा भाग म्हणून नव्या समाजमाध्यम विभागाचीसुद्धा लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.
- ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविड आणि अन्य सदस्यांमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीदरम्यान यासंबंधी चर्चा करण्यात आली. भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान सहा यांच्या दुखापतींवर उपचार करण्यात ‘एनसीए’ला अपयश आल्यामुळे नवीन वर्षांत ही मोहीम ‘बीसीसीआय’ने हाती
घेतली आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा यांनीही ‘एनसीए’मध्ये उपचार घेण्यापेक्षा वैयक्तिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेतले. - खेळाडूंच्या दुखापतींवर गांभीर्याने उपचार करण्यासाठी लंडनच्या ‘फोर्टिअस’ यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय चमूची नेमणूक करण्यात येणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय वेगवान गोलंदाजीच्या प्रशिक्षकाचीसुद्धा लवकरच नेमणूक करण्यात येईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
- तर खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी माहिती विश्लेषकाची नियुक्ती करण्यात येणार असून पुढील 18 महिन्यांत ‘एनसीए’मध्ये सर्व पदांवर योग्य व्यक्ती कार्यभार सांभाळत असेल, असे आश्वासनही त्या अधिकाऱ्याने दिले आहे.
सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ
- राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दीर्घिकेचा (गॅलरी) शोध लावला असून, या दीर्घिकेभोवती हायड्रोजन वायूचा अंगठीच्या आकाराचा गोलाकार वायुमेघ आहे. जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप वापरून शास्त्रज्ञांनी हा वायुमेघ शोधला असून, त्याच्या आतील दीर्घिका पृथ्वीपासून 260 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.
- तर या वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या चौपट असून, अशा प्रकारच्या वायुमेघाचा शोध 1987 मध्ये लागला होता. मात्र, तो पृथ्वीपासून सुमारे 130 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर होता. परंतु एनसीआरएमधील शास्त्रज्ञ ओम्कार बाईत आणि प्रा. योगेश वाडदेकर यांनी आता नव्या दीर्घिकेचा शोध लावला आहे. हे संशोधन मंथली नोटीस रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांकडून अशा नऊ दीर्घिकांचा अभ्यास केला जाणार आहे.
- तसेच योगेश वाडदेकर म्हणाले, अशा प्रकारच्या वायुमेघाची निर्मिती नेमकी कशी झाली, हे कोडे आहे. सूर्यमालेशी त्याची तुलना करता येत नाही, कारण वायुमेघाचे वस्तुमान सूर्याच्या दोन अब्जपट आहे. सूर्यमालेचा व्यास काही प्रकाश तास आहे, तर या वायुमेघाचा व्यास 3 लाख 80 हजार प्रकाश वर्ष आहे.
- अणुरूपी हायड्रोजन सुमारे 2 सेमीच्या तरंगलांबीवर रेडिओ लहरी उत्सर्जित करतो. रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना हायड्रोजन अणूंच्या किरणोत्सर्गामुळे आपल्या आकाशगंगेमध्ये व जवळील दीर्घिकांमध्ये हायड्रोजन वायूचे प्रमाण व वितरण यांचा नकाशा तयार करता येतो. हायड्रोजनचा मोठा साठा सक्रियपणे तारे निर्माण करणाऱ्या दीर्घिकांमध्ये आढळतो. या नव्या दीर्घिकेमध्ये तारे तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन दिसत आहे.
दिनविशेष
- 3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
- हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
- सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
- 3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
- नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.


0 Comments